Sunday 22 November 2015

महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांची शिकवण




नव्या प्रकाशाच्या प्राप्‍तीसाठी सिध्दार्थ गौतम जेव्हा चिंतनास बसले, तेव्हा त्यांच्या मनावर महर्षी कपिलांच्या सांख्य तत्वज्ञानाची पकड होती. महर्षी कपिलांनी दु:खाचे अस्तित्व मान्य केले होते. जगातील व्यथा आणि दु:ख ही एक निर्विवाद वस्तुस्थिती आहे असे त्यांनी मान्य केले. परंतू दु:ख कसे नाहिसे करावे ह्या प्रश्‍नाचा विचार सांख्य तत्वज्ञानाने केला नाही. म्हणून दु:ख कसे नाहिसे करावे या प्रश्‍नावर सिध्दार्थ गौतमांनी आपले चित्त केंद्रित केले. त्यांनी स्वत:ला पहिला प्रश्‍न विचारला की, “व्यक्‍तिमात्राला भोगाव्या लागणार्‍या दु:खाची व कष्टाची कारणे कोणती ?” त्यांचा दुसरा प्रश्‍न असा होता की, “दु:ख नाहिसे कसे करता येईल ?” या दोन्हिही प्रश्‍नाचे उत्तरे त्यांनी शोधले. दु:खाचे उगम कसे होते आणि त्यातून मुक्‍त कसे व्हायचे याचा शोध फ़क्‍त बुध्दांनी लावला. दु:ख, दु:ख समुदय, दु:ख निरोध व दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा हा चार सत्याचा शोध भगवान बुध्दांनी लावला.
भगवान बुध्दांच्या काळात अनेक मतप्रणाली अस्तित्वात होत्या. ह्या मतप्रणाली साधारणत: दोन भागात विभागल्या जातात. एक उच्छेदवादी व दुसरे शाश्वतवादी. सर्व काही संपणारे आहे म्हणून खा, प्या आणि मजा करा अशी उच्छेदवादी विचारसरणी होती. आत्मा शाश्वत आहे म्हणून हे माझे, ते माझे असे शाश्वतवादी विचारसरणी होती. भगवान बुध्दांनी या दोन्हिही विचारसरणीला नाकारले.
भगवान बुध्दाने प्रथमत: पांच परीव्राजक म्हणजे कौण्डिण्य, अश्वजित, कश्यप, महानाम आणि भद्रिक यांना सारनाथ येथे धम्माचा उपदेश केला व त्यानंतर त्यांचा धम्म संपुर्ण जगात पसरला.
भगवान बुध्द या प्रथम धम्मचक्र प्रवर्तन सुत्तात म्हणतात की, ‘जीवनाच्या आत्यंतिक असे दोन टोके म्हणजे खा, प्या आणि मजा करा, आणि सर्व वासना मारुन टाका. कारण ते पुनर्जन्माचे मुळ आहेत.’ यां दोन्हिंही टोकांना नाकारुन जो उपभोगाचा नाही आणि आत्मक्लेशाचाही नाही असा मध्यम मार्ग त्यांनी स्विकारला. याच मध्यम मार्गाची शिकवण भगवान बुध्दांनी दिली. तेव्हा हे मध्यम मार्ग दुसरे-तिसरे काही नसून चार सत्यच आहेत. हाच मार्ग मानव मुक्‍तीचा आहे. इश्वर, आत्मा वगैरे काल्पनिक गोष्टीला स्थान न देता त्यांनी ‘माणूस आणि माणसाचे या जगातील नाते’ याला प्राध्यांन्य देऊन आपला धम्म सांगितला. म्हणूनच त्यांच्या धम्माला ‘एहि पस्सिको’ म्हणजे ‘या आणि प्रत्यक्ष पाहा‘ असे म्हटले आहे.
याच सुत्तात ते पुढे म्हणतात की, “माझ्या धम्माचा ईश्वर, आत्मा, कर्मकांड व मरनोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. मनूष्यप्राणी दु:ख, दैन्य आणि दारिद्रयात राहात आहेत. हे सर्व जग दु:खाने भरले आहे. म्हणून हे दु:ख नाहीसे करणे हा माझ्या धम्माचा उद्देश आहे. दु:खाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा माझ्या धम्माचा पाया आहे.
जगातील सर्व प्राणी दु:खाने पिडलेले आहेत. कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने ते दु:खी झालेले असतात. मनाच्या विरुध्द कुठली गोष्ट घडली की झाला दु:खी ! सर्व संसार दु:खाच्या समुद्रात गटांगळ्या खात आहेत. जेथे जेथे जीवन आहे तेथे तेथे दु:खही दु:ख भरलेले आहे.
केवळ मनुष्यप्राण्याच्या बाबतीत जरी विचार केला तरी माणसां-माणसात झगडा, कलह, भांडण, वाद-विवाद अशा गोष्टींचा जिकडे तिकडे बोलबोला दिसून येईल. जिकडे तिकडे आतंकवाद, फुटिरतावाद, वर्णवाद, वर्गवाद, जातीवाद, धर्म-पंथवाद, भाषावाद, प्रांतवाद, राष्ट्रवाद अशा गोष्टी बोकाळलेल्या दिसतील. जिकडे तिकडे चोरी, लुटमार, फसवणुक, हिंसाचार, भ्रष्टाचार, खोटेपणा याच गोष्टींचा भरमार दिसून येईल.
लोकं कोणत्या ना कोणत्या तरी भितीने ग्रस्त झालेला असतो… थंडी वाढली तरी भिती… गरमी वाढली तरी भिती… खुप पाऊस पडला तरी भिती… कमी पाऊस पडला तरी भिती… कुणाला भुकेची-तहानेची भिती… कुणाला रोगराई, बिमारी, मरणाची भिती… कुणाला म्हातारपणाची भिती… कोणी तलवार, चाकु बंदुका काढल्या की भिती…कोणी चोरी, लुटमार करेल कां म्हणून भिती… कुणाला लढाई ची भिती… बॉंबस्फोटात मरण्याची, जखमी होण्याची भिती… आगिची, अपघाताची भिती…. दहशतवादी, नक्षलवादी लोकांची भिती…भितीच भिती…जो तो भितीने पछाडलेला असतो. याचे पर्यवसान त्याला दु:ख निर्माण करण्यात होत असते.
कोणी भुकेने तडपतो आहे. कोणी तहानेने व्याकुळ होतो. कुणाकडे शरीर झाकण्याकरीता पुरेसे वस्त्र नाहीत. कुणाला ऊण, वारा, पावसापासून वाचण्यासाठी आच्छादन नाही. कोणाकडे दवाई-पाणी घेण्याकरीता पुरेसे पैसे नहीत. कोणी आपल्या मुला-बाळांना शिकवू शकत नाही. कोणी गरिबीपूढे हात टेकले आहेत. कोणाकडे पैसा असुनही मानसीक समाधान नाही. म्हणजेच दु:खाला पारावार नाही !
कुठे पती व पत्‍नीमध्ये भांडण, कुठे वडील व मुलांमध्ये भांडण, कुठे आई व मुलामध्ये भांडण, कुठे मुलां-मुलांमध्ये भांडण, कुठे सासु व सुनांमध्ये भांडण, कुठे शेजार्‍यां-पाजार्‍यांशी भाडण, कुठे मोहल्या-मोहल्यात, गावां-गावां भांडण. कुठे जाती-जातींमध्ये भांडण. कुठे धन-संपत्तीसाठी भांडण, कुठे जमिन-जुमल्यासाठी, कुठे मानसन्मानासाठी भांडण, कुठे हुंड्यासाठी भांडण. भांडणाला काही अंत नाही. पुढे हे भांडण विकोपाला जावून मारामारी, खुन, जाळपोळ, हिंसाचार इत्यादी प्रकार घडतात. मग हे प्रकरण पोलीसांपर्यंत, कोर्टापर्यंत जाते. त्याची परिणीती म्हणजे मानहानी व पैश्याची नासाडी… कोर्टाच्या निकालानंतर तुरुंगवास अथवा फाशीची शिक्षा… म्हणजेच भांडणाचा शेवट हा दु;खांमध्येच परिवर्तीत होते.
कोणी आपल्याला बौद्ध म्हणोत , हिंदु म्हणोत, ख्रिचन म्हणोत, शिख म्हणोत, जैन म्हणोत अथवा कोणी मुसलमान म्हणोत. कोणीही या दु:खापासून मुक्त नाही. कोणताही मनुष्य मग तो गरिब असो की श्रिमंत, गृहस्थी असो की गृहत्यागी-सन्यासी, अशिक्षित असो की सुशिक्षित , राजा असो की रंक अशा सर्वांनाच दु:खापासून सुटका नाही.
हे दु:ख काय आहे ? या दु:खामागील कारणे काय आहेत ? या दु:खाला लोकं वारंवार बळी कां पडतात. या दु:खाचे निवारण करणे शक्य आहे काय ? जर असेल तर त्याचे उपाय काय आहेत ? दु:ख निर्माण होण्यापुर्विच त्या मागिल कारणाला रोखणे शक्य आहे काय ? इत्यादी अनेक प्रश्‍न सर्वांनाच पडते. कित्येकांनी त्याचा शोध घेऊन पाहिला असेलही ! कित्येकांनी याच्या मागे देव, ईश्वर, परमात्मा यासारखे शक्ती असल्याचे कारणे सांगून स्वत:ची जबाबदारी झटकून टाकली आहे. त्यासाठी त्यांनी देवपुजा, देवभक्ती, आहुती देणे, नैवद्य देणे, बळी देणे, लाच देणे, इत्यादी दु:खमुक्तीचे अगदी सोपे उपाय सांगितले आहेत. जीवनात केलेल्या दुष्कृत्याच्या पापाची डागे गंगा, गोदावरी सारख्या तथाकथीत पवित्र नदीमध्ये व कुंभमेळ्यामधे स्नान करुन धुवून काढता येते अशी शिकवण धर्मभोळे लोकांना सांगितले आहे. परंतु भगवान बुध्दाने मात्र याचा शोध शास्त्रिय व वैज्ञानीक दृष्टिकोनातून घेतला आहे. दु:ख, दु:ख निर्मिती, त्याची कारणे, त्यावर उपाय इत्यादी सर्व बाबींचा सखोलपणे अभ्यास करुन त्यानी सविस्तर अशी मांडणी केली आहे.
भगवान बुध्दांचा प्रथम धम्मचक्र प्रवर्तनापासून तर आतापर्यंत आणि भविष्यात सुध्दा जे कोणी धम्म सांगतील ते दुसरे-तिसरे काही राहणार नसून ते चार सत्याचाच सार राहील असे ठामपणे म्हणावे लागेल. भगवान बुध्दांने याला उत्तम शरण असे म्हटले आहे.
भगवान बुध्द धम्मपदाच्या एकशेएकान्नव व एकशेब्यान्नवव्या गाथेत म्हणतात –
दु:ख दुक्खसमुप्पादं दुक्खस्स च अतिक्क्मं ।
अरियञ्चग्ङिकं मग्गं दुक्खूपसगामिनं ॥
एतं खो सरणं खेमं एतं सरण्मुत्तमं ।
एतं सरणमागम्म सब्बदुक्खा पमुच्चति ॥
याचा अर्थ, जो चार सत्यांना योग्य प्रकारे प्रज्ञेने पाहतो व दु:ख, दु:खाची उत्पत्ती, दु:खाचा विनाश व दु;खाचे उपशमन करणारा अष्टांगिक मार्ग याचे शरण ग्रहण करणे हेच कल्याणकारी आहे, हेच उत्तम शरण आहे. या शरणाला ग्रहण करुन मनुष्य सर्व दु:खातून मुक्त होतो. परंतु यासाठी तुम्हीच प्रयत्‍न केले पाहिजे असे भगवान बुध्द म्हणतात-
तुम्हेहि किच्चं आतप्पं अक्खातारो तथागता ।
याचा अर्थ, तुम्हीच प्रयत्‍न केले पाहिजे. तथागत केवळ मार्गदाता आहे.
म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बुध्द आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्याबुध्दांने कोणते बदल केले?’ यां भागात ‘कार्यकारणभावाचा अत्यंत महत्वाचा नियम आणि त्याचे उपसुध्दांत भगवान बुध्दांनी मान्य केले.’ असे लिहिले आहे. कार्यकारणभावाचा म्हणजेच प्रतित्यसमुत्पादाचा हाच सिध्दांत म्हणजे चार आर्यसत्याचा अविष्कार होय. म्हणूनच दु:ख, दु:ख समुदय, दु:ख निरोध व दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा हे चार आर्यसत्ये समजणे म्हणजेच भगवान बुध्दांचा धम्म समजणे असे म्हटल्या जाते.
तथापी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या ‘परिचय’ मध्ये चार प्रश्‍न उपस्थित केले. त्यापैकी एका प्रश्‍नात ते म्हणतात की, “चार आर्यसत्याचा भगवान बुध्दाच्या मूळ शिकवणीत अंतर्भाव होता काय, की ती भिक्खूंनी नंतर दिलेली जोड आहे ? कारण हे चार आर्यसत्य बुध्दाच्या आचारतत्वांना निराशावादी ठरवतात.”
त्याच ग्रंथात बौध्द धम्म निराशावादी आहे काय ? या प्रश्‍नाला ते उत्तर देतांना म्हणतात की, “जगात दु:ख आहे असे पहिल्या आर्यसत्यात भगवान बुध्द म्हणतात. तसेच कार्ल मार्क्सही असे म्हणाला होता की, जगात शोषण सुरु आहे, आणि श्रीमंत लोक अधिक श्रीमंत केले जात आहेत व गरीब लोक अधिक गरीब केले जात आहेत. तरीही कार्ल मार्क्सचा सिद्धांत निराशावादी आहे असे कोणी म्हणत नाही. तर मग भगवान बुध्दाच्या सिद्धांताबाबत निराळा दृष्टिकोन कां ?” भगवान बुध्दाच्या बाबतीत असा दृष्टिकोन बाळगणे चुकीचे आहे.
भगवान बुध्द जरी दु:खाचे अस्तित्व मान्य करीत असले तरी ते दुसर्‍या आर्यसत्यात दु:खाचा नाश केला पाहिजे यावर विशेष भर देतात. दु:खाचे निरसन करण्याचा मार्ग सुध्दा त्यांनी सांगितल्यामुळे त्यांना दु:खाचे अस्तित्व सांगावे लागले. असे असतांना बुध्दाचा धम्म निराशावादी आहे, असे कसे म्हणता येईल ? भगवान बुध्दाच्या धम्मात मानवी जीवनाचा उद्देश आणि आशा या दोहोंचाही अंतर्भाव आहे.
जग आणि जीवन दु:खमय नाही तर जगात आणि जीवनात दु:ख आहे असा नवा विचार त्यांनी मांडला. या दु:खावर मात करता येते असे त्यांनी ठासून सांगितले. या दु:खावर मात करण्याचा उपायही त्यांनी सांगितला.
भगवान बुध्दाने सतत आयुष्याच्या अखेरपर्यंत सतत भ्रमण करुन विपश्यना विद्येच्या माध्यमातून लोकांना दु:खमुक्तीचा मार्ग सांगितला. परिनामस्वरुपत: त्यांच्या जीवनकाळामध्ये हजारो गृहत्याग करणार्‍या भिक्खु आणि भिक्खुंनी अरहंत झालेत, निर्वाणपदा पोहचवून पुर्णत: दु;ख मुक्त झालेत. तसेच अन्य भिक्खु आणि भिक्खुंनीसहित लाखोच्या संख्येत गृहास्थी जीवन जगणारे लोकं सुध्दा सत्याचा साक्षात्कार होऊन स्त्रोतापन्न झालेत. दु:ख मुक्त झालेत. भगवान बुध्दाचा विपश्यना मार्ग या चार आर्यसत्याचा आधार घेऊन जगातील करोडो लोकांचे कल्याणाचा मार्ग प्रशस्त करुन याच जीवनामध्ये प्रत्यक्ष दु:ख-विमुक्तीचा अनुभव करुन देत आहेत.
विपश्यना शिबीरामध्ये चित्ताला निर्मळ करुन शेवटच्या दिवशी मंगल मैत्रीचा अभ्यास केला जात असतो. ‘भवंतु सब्ब मंगलं’ चा मंगलकारी घोषाने संपुर्ण आसमंतात मंगल-घोषाचे तरंगच-तरंग जिकडे-तिकडे पसरत असतात
कोणी एखादा निष्णात डॉक्टर रोग्यांना सांगतो की, तुला अमुक रोग झाला आहे व त्यावर मी औषधी-उपचार करुन तुझा रोग बरा करु शकतो. तो रोगी त्यांच्या वैद्यकीय उपचाराने बरा होतो. मग त्या डॉक्टरला कोणी रोगवादी म्हणतील की निरोगवादी ? तसेच चार आर्यसत्याच्या माध्यमातून दु:खाने पिडित असलेल्या लोकांना दु:ख मुक्तीचा मार्ग सांगून त्यांना भगवान बुध्द याच जीवनामध्ये दु:ख मुक्त करतात अश्या भगवान बुध्दाला आणि त्यांच्या शास्त्रशुध्द तत्वज्ञानाला व शिकवणीला निराशावादी कसे म्हणता येईल ?
जो निराशावादी किंवा दु:खवादी असेल तो केवळ दु:खाचा प्रचार करेल. तो लोकांच्या सुखाची कामना करणार नाही. मात्र ‘सब्बे सत्ता सुखी होन्तु’ अशा मैत्रीभावनेचे शिकवण देणारे भगवान बुध्द लोकांच्या सुखाची कामना करतात. गेल्या कित्येक वर्षे भगवान बुध्दाच्या विपश्यना साधनेच्या दूर असणारे लोकं भगवान बुध्द किती धम्मवादी, सुखवादी व मंगलवादी होते ते अशा लोकांना कसे कळणार ?
धम्मपदामध्ये सुख आणि दु:खाच्या बाबतीत खालील दोन आहेत. पहिले पद असे आहे-
मनसा चे पदुट्ठेन, भासति वा करोती वा।
ततो नं दुक्खमन्वेति, चक्कं व वहतो पदं॥
याचा अर्थ अशुध्द चित्ताने जो कोणी व्यक्ती शरीर अथवा वाणीने कर्म करतो तेव्हा त्याच्या मागे जसे गाडीला ओढणार्‍या बैलाच्या मागे त्या गाडीचे चाके येत असतात तसे दु;ख त्याच्या मागे येत असतात.
दुसरे पद असे आहे-
मनसा चे पसन्नेन, भासति वा करोती वा।
ततो नं सुखमन्वेति, छाया व अनपायिनि ॥
याचा अर्थ प्रसन्न चित्ताने जो कोणी व्यक्ती शरीर अथवा वाणीने कर्म करतो तेव्हा त्याची सावली जशी त्याचा पिच्छा सोडत नाही तसे सुख त्याच्या मागे येत असते.
स्पष्ट आहे की मलीन चित्ताने जो कोणी व्यक्ती शरीर अथवा वाणीने कर्म करतो ते दुष्कृत्येच असेल आणि दुष्कृत्याचे फळ नेहमी दु:खदच असते. त्याचमाणे निर्मळ चित्ताने जो कोणी व्यक्ती शरीर अथवा वाणीने कर्म करतो ते सत्कृत्येच असेल आणि सत्कृत्याचे फळ नेहमी सुखदच असते.
यापरुन धम्मपदामध्ये पहिल्या पदामध्ये दु:खाचे व दुसर्‍या पदामध्ये सुखाचे अशा दोन्हिही दु:ख आणि सुखाचे विवेचन केले आहे.
जर धम्मपद हा ग्रंथ संपुर्णपणे वाचला तर त्यात धम्माच्या बाबतीत भगवान बुध्दाच्या शिकवणूकीचे निरनिराळ्या विषयावर २६ वग्गाचे संकलन केलेले दिसते. यामध्ये एक सुख वग्ग आहे. परंतु त्यात दु:खाचा एकही वग्ग नाही. म्हणून. भगवान बुध्दाचा धम्म निराशावादी व दु:खवादी आहे असे कसे म्हणता येईल ?
भगवान बुध्दाने जसे दु:खाबाबत चर्चा केली तसे सुखाबाबत सुध्दा केली आहे. जेथे दु:खाबाबत चर्चा केली तेथे दु:खाचे कारणे प्रकाशात आणून ते दूर करण्यासाठी उत्साहित केले आहे. तसेच जेथे सुखाबाबत चर्चा केली तेथे त्याचे कारणे स्पष्ट करुन त्याचे सवंर्धन करण्यासाठी उत्साहित केले आहे. त्यामुळे भगवान बुध्दाचा धम्म निराशावादी व दु:खवादी आहे असे म्हणने चुकीचे ठरेल.
भगवान बुध्दाचा हेतू अविद्या नष्ट करणे हा आहे. अविद्या म्हणजे दु:खाच्या अस्तित्वाविषयीचे अज्ञान होय. त्यात आशा आहे. कारण मानवी दु:खाचा अंत करण्याचा मार्ग ते दाखवितात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी `बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथामध्ये लिहिले आहे की, दारिद्र्य हे दु:खाचे उगमस्थान आहे. परंतु दारिद्र्य नाशाने सुख लाभेलच असे नाही. सुख लाभते ते उच्च राहणीवर अवलंबून नसून ते उच्च संस्कृतीवर अवलंबून आहे.
सिध्दार्थ गौतमाला ३५ व्या वर्षी बुध्दत्व प्राप्‍त झाले. त्यानंतर पंचेचाळीस वर्षे भगवान बुध्दांनी दु:ख आणि दु:खमुक्‍तीचा मार्ग याचीच शिकवण दिली आहे. भगवान बुध्दाचे उपदेश ह्या चार आर्यसत्यावर आधारलेले आहेत. ज्याप्रमाणे पृथ्वीतलावर चालणार्‍या प्रत्येक प्राण्याच्या पायाचा ठसा हत्तीच्या पायाच्या ठशात बसू शकतो, त्याचप्रमाणे भगवान बुध्दांची शिकवण या चार आर्यसत्यांच्या शिकवणीत सामावली आहे. बुध्द धम्म समजून घेण्यासाठी ही चार आर्यसत्य समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्रिपिटकात चार आर्यसत्यांचा उल्लेख अनेक ठिकाणी आलेला आहे. ही चार आर्यसत्य भगवान बुध्दाच्या धम्माचा पाया आहे असे म्हटले जाते.
भगवान बुध्दांनी एखाद्या कुशल वैद्याप्रमाणे चार आर्यसत्याचे मुलभूत विश्‍लेषण केले आहे. त्यांनी प्रथम रोगाचे निदान करुन त्याचे कारण जाणले आहे. तो रोग कसा निर्माण होतो, हे त्यांनी जाणले आहे. नंतर तो रोग नष्ट करण्याचे निश्चित केले व शेवटी त्यावर उपाय सांगितला. दु:ख हा रोग आहे. तृष्णा हे त्या रोगाचे कारण आहे या रोगावर उपाय करता येतो. आर्यअष्टांगिक मार्गाने हा रोग कायमचा बरा करता येतो, हे सुत्र भगवान बुध्दांनी मांडले. म्हणूनच त्यांना अप्रतिम वैद्य आणि कुशल शल्यकार असे म्हटले जाते.
आजच्या काळात ‘आर्य’ या शब्दाचा अर्थ केवळ जातिवाचक झालेला आहे. मात्र भगवान बुध्दांच्या काळात ‘आर्य’ या शब्दाचा अर्थ गुणवाचक होता. व्यक्ती कोणत्याही जातिचा असो तो धम्माच्या मार्गाने, शील-समाधी व प्रज्ञेचा अभ्यास करुन मुक्तीच्या चार पायर्‍यापैकी पहिल्या स्त्रोतापन्न या पहिल्या पायरीपर्यंत जरी कोणी पोहचला तरी त्यालाआर्य’ असे संबोधल्या जात असे. त्यानंतर दुसरी सकृदागामी, तिसरी अनागामी आणि चवथी पायरी अहर्त येथपर्यंत प्रवास करणारे अर्थात आर्य म्हणूनच संबोधल्या जात असे. आर्यसत्य म्हणजे आर्याचे किवा अहर्ताचे सत्य अशी व्याख्या वसुबन्धु आणि बुध्दघोष यांनी केली आहे. आर्य म्हणजे ज्यांचे सर्व अकुशल पापधर्म दूर झाले आहेत तो’ अशी मज्झिमनिकायात व्याख्या केली आहे. तर जो पापकर्मापासून अत्यंत दूर गेला आहे तो आर्य. असे अभिधर्मकोषभाष्यात म्हटले आहे. अशा आर्याचे सत्य म्हणजे आर्यसत्य. आर्य म्हणजे पवित्र, सर्वश्रेष्ठ असाही अर्थ होवू शकतो.

No comments:

Post a Comment