Thursday 16 March 2017

"जातींचा नाईनाट कसा होईल?"

"जातींचा नाईनाट कसा होईल "
Annihilation of caste


वर्णाश्रमासोबत हिंदूंना ब्राम्हणांनी दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे जात होय. भारतात एकूण ६५०० पेक्षा अधिक जाती असून त्यातही अस्पृश्यांच्या जवळपास १००० जाती आहेत.या जातीपैकी महाराष्ट्रात ५९ जाती आहेत. त्यात मुख्यता चार प्रमुख जाती आहेत. १) महार  २) चांभार  ३) मांग ४ ) भंगी / मेहतर. महाराचे प्रमाण हे राज्याच्या लोकसंख्येच्या ७ % आहे. ब्राम्हणांइतकेच या कनिष्ठ जातींवर अधिक हक्क गाजविणारे कुणबी, तेली, माळी आदी जाती आहेत. जातीच्या निर्मितीत जेव्हा शुद्र वर्णाच्या अन्यायाला चिडून प्रतीरोध दर्शविला गेला तेव्हा या विरोधी लोकांना शांत करण्यासाठी ब्राम्हणांनी जातीच्या सुधारणेत बदल करून या प्रतीरोधींना तेली, कुणबी, माळी आदी जातीत परावर्तीत केले. यां जातींना कनिष्ठ जातीवर वर्चस्व जरी दिल्या गेले तरी श्रेष्ठत्व मात्र ब्राम्हणांनी स्वत:च्याच अधिपत्यात ठेविले. आजही तेली, कुणबी स्वत:ला महार, मांग, चांभार, भंगी, मेहतर यांच्यापेक्षा श्रेष्ठ जातीचे समजतात आणि ब्राम्हणांईतकेच कनिष्ठ जातीवर अन्याय करण्यात पराक्रम दाखवितात, त्यांना हीन समजतात. ब्राम्हणांपेक्षाही ब्राम्हणेतर जाती त्यांच्या पेक्षा कनिष्ठ जातींवर अन्याय अत्याचार करतांना दिसून येतात.

             या देशाची मुख्य समस्या जर कोणती असेल तर ती जात आहे असे प्रतिपादित करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाती निर्माण होण्याची कारणे आणि त्यावरील उपाययोजना यावर बाबासाहेबांनी Annihilation of caste  आणि  caste in india  ही पुस्तके लिहलीत. त्यावेळी जरी बाबसाहेबांच्या ‘जातीचा संपूर्ण नायनाट’ या मताला महत्व दिल्या गेले नसले तरी बाबासाहेबांनी केलेल्या अनेक भाकीतांपैकी, हे भाकीत सुद्धा आता सत्यात उतरले आहे. १९३६ ला त्यांच्या  Annihilation of Caste या पुस्तकाच्या दीड हजार प्रती काही अवघ्या दिवसातच खपल्या गेल्या होत्या हे मात्र विशेष.

             नुकताच भारताप्रती अमेरिकेने भारताचे सर्वेक्षण करून भारताची मुख्य समस्या जात (caste ) आहे असा अहवाला दिलाय. इतकेच नाही तर भारत कधीच विकसित राष्ट्र होणार नाही असेही या अहवालात दर्शविण्यात आले आहे. कारण भारतासमोर अनेक धर्म, धर्मातील जाती, भ्रष्टाचार, लोकसंख्यावाढ, आतंकवाद, बेकारी, गरीबी, निष्क्रीय जनता आणि त्यांचे सरकार, लोकांची अकार्यक्षमता, फालतुचे संस्कार, परंपरा, अनावश्यक संस्कृत्या, विभूतीपुजा देव आणि त्यांची देवळे, देशाप्रती असलेली अप्रामानिकता आदी प्रश्न आ वासून उभे आहेत. ज्या प्रश्नांवर बाबासाहेबांनी योग्य उपाययोजना देवूनही या प्रश्नांकडे कानाडोळा केल्यामुळे भारत अजूनही विकसनशील देश आहे. इतक्या समस्या असतांनीही भारत आज एकसंथ राहण्याचे मुख्य कारण भारताचे  ' संविधान ' आहे. भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी ,' भारत २०२० ला विकसित राष्ट्र होईल.' हे भाकीत कोणत्या तंद्रीत केले हे मात्र प्रश्नचिन्हच  आहे. ज्या देशातील समस्याचे अगोदर निराकरण होत नाही, उलट त्या वाढतच जात आहेत आहे तेथे कलामांचे हे भाकीत बिनबुडाचे आहे.

             भारतातील जातीचे आर्थिक दृष्टीकोनातून विश्लेषण करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पहिलेच अर्थशास्त्रज्ञ होय. त्यांनी ठोसून सांगितले की, जातीव्यवस्थेत केवळ श्रमाचीच विभागणी झाली नाही तर त्यात श्रमिकांचीही विभागणी झाली. जगात कुठल्याही समाजात श्रमविभाजनाची अत्यंत अनैसर्गिक पंजीबद्ध करण्यात आलेल्या श्रमिकांच्या विभागणीची सांगड घातल्या गेली नाही.  जातीने श्रमिकांची श्रेष्ठ - कनिष्ठ वर्गात विभागणी केल्या गेली आहे. जसे लोहाराचा मुलगा लोहाराचेच काम करेल. सुताराचा मुलगा सुताराचेच काम करेल. या कनिष्ठ जातींना आर्थिक प्रगती वाढविण्याचा दुसरा कोणताही व्यवसाय करता येणार नाही. भारतातील बहिष्कृत समाजात आपोआप आर्थिक तफावत निर्माण झाली नाही तर ब्राम्हणांकडून ती हेतुपुरस्सर करण्यात आली. आज जर बहिष्कृत समाज हा ब्राम्हण, क्षत्रीय, वैश्य यांच्यापेक्षा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आदी दृष्ट्या मागासला असेल तर याला जात ( caste) जबाबदार आहे. जातीने  बहिष्कृत लोकांना अपमानजनक ओळख आणि अप्रगतीयुक्त काम दिले. (insulting identity & useless work)  जसे एखाद्या महाराच्या पोरात कितीही विद्वत्ता असली तरी त्याच्याकडे दुसऱ्यांचा बघण्याचा दृष्टीकोन एक महाराचं पोरच असेल. दुसरी गोष्ट त्याच्यात एका इंजिनीअरची जरी ऐपत असली  तरी त्याला वर्णाश्रमाने पाडून दिलेला नाल्या साफ करण्याचाच व्यवसाय करावा लागेल. भारतीय संविधानामुळे जरी बहिष्कृत लोकांना त्यांचे मुलभूत अधिकार मिळाले असले तरी जोपर्यंत ते हिंदू धर्माच्या जातीत राहतील तोपर्यंत त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे वर्णाश्रमाचेच आधिपत्य राहील. ही व्यावसायिक आणि शिक्षणिक मानसिकता हिंदू धर्मातून कधीच जाणार नाही.

           एक आर्थिक संस्था या दृष्टीने जात ही एक घातकी संस्था आहे. कारण तिच्यामध्ये माणसाची नैसर्गिक शक्ती आणि मनोवृत्ती सामाजिक नियमांच्या जकडीत गुदमरून जाते. जातीभेदाने श्रामाचीच विभागणी केली नाही तर तिने श्रमिकांचे वर्ग सुद्धा तयार केलेत. हे वर्ग पहिल्यावर दुसरा तर दुसऱ्यावर तिसरा याप्रमाणे जन्मजात प्रतवारी लावून देणारी संस्था आहे. दुसऱ्या कोणत्याही देशात श्रमविभाजनाला अशा तर्हेचा श्रमिकांचा दर्जा चिकटवून दिलेला नाही. एकप्रकारे हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानात दुसरे तिसरे काही नसून एका जातीची उत्पत्ती अत्यंत श्रेष्ठ तर दुसऱ्या जातीची उत्पत्ती निर्कृष्ठ असाच दाखविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अशातर्हेचा हिंदू समाज हा एक आदर्श समाज कधीच न ठरता तो अनेक शत्रूंचे असलेले एक विशाल घरच म्हणावे लागेल. ज्या घरातील प्रत्येक सदस्य स्वत:च्या स्वार्थी आदर्शासाठी जगतो. मोठे लहानांना तुडवीत असलेले, सशक्त अशक्तांना वरचढ होतांना, निर्दय लोक निर्भय झालेले, सद्गृहस्थ भ्याड झालेले आणि शहाण्यांना कशाचीच तमा नसलेले लोक या जातीच्या वर्गवारीमुळे हिंदू धर्मात निर्माण झालेत. सर्व सुधारणांना गावच्या वेशीवर टांगणाऱ्या जातीने सार्वजनिक हिताची वृत्ती सुद्धा ठार मारली. इतकेच नाही तर सार्वजनिक लोकमत सुद्धा जातीने मारले. जातीने संपूर्ण हिंदू धर्माच्या बहिष्कृत लोकांचे जीवन नरकमय करून टाकले. ज्याविरुद्ध एल्गार करण्याची एकाही गुणवान हिंदू पुढाऱ्याची हिंम्मत कधी झाली नाही. माणसाला नपुसकत्व देणाऱ्या या धर्माबद्दल बाबासाहेब म्हणतात, “ मुसलमान निर्दयी आहेत तर हिंदू नीच आहेत, आणि नीचपणा निर्दयीपणा पेक्षा अति वाईट आहे.” अशा हिंदू धर्माला आकर्षित होऊन जर कुणी हिंदू धर्म स्वीकारावा अशी इच्छा व्यक्त केली तर त्याला हिंदू धर्मातील कोणती जात मिळेल ? बहुतेक ब्राम्हण सोडून इतर वर्णात त्याचे स्थान निश्चित होईल. हिंदू समाज हा केवळ जातीचा संग्रह असल्यामुळे जात ही बंद असलेली संस्था असल्यामुळे हिंदू धर्मात मुस्लीमांसारखेच धर्मांतरीत माणसाला स्थान नाही. जोपर्यंत वर्ण आणि जाती जिवंत आहेत तोपर्यंत हिंदू धर्माचे बहिष्कृत वर्ग कधीच शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात अविकसित असलेल्या गुलामीच्या बेड्या तोडू शकणार नाही. 
    
       डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणतात , "हिंदू समाज हा एक मनोरा आहे. या मनोऱ्याला शिडी नाही. त्यातील प्रत्येक जात म्हणजे इमारतीचा एक एक मजला आहे. खालच्या जातीतील लोकांना वरच्या जातीतील मजल्यात  प्रवेश नाही. खालच्या जातीतील माणूस कितीही लायक असो त्याला वरच्या जातीत जाण्याचा मार्ग नाही तर वरच्या जातीतील मनुष्य कितीही नालायक असो त्याला खालच्या जातीच्या मजल्यात लोटून देण्याची क्षमता नाही. जातीच्या पायावर तुम्ही कोणतीही इमारत उभारू शकत नाही. तुम्ही राष्ट्राची उभारणी करू शकत नाही; तुम्ही नितीमत्तेची उभारणी करू शकत नाही. जातीच्या पायावर तुम्ही जे काही बांधाल ते कोसळून पडेल आणि एकसंघ कधीच होणार नाही.”

        जात अशी जी कधीच जात नाही. जात ती जी मुल जन्माच्या अगोदरच ठरल्या गेली आहे आणि मनुष्याच्या मृत्यूनंतरही ती पिढ्यानपिढ्या त्याला चिकटूनच असेल. मग त्याने त्याच्या आयुष्यात कितीही प्रगाढ समाजहित कार्ये केली असली तरी त्याच्या मृत्यूनंतरही  त्याला त्याच जातीने ओळखले जाईल. जो धर्मच स्वतंत्र, समता, बंधुता, न्यायावर आधारित नाही तो धर्म नसून घोड्याला आवरण्यासाठी खुट्याला बांधलेला निमुळत्या आकाराचा दोर आहे. घोडा तो दोर एका झटक्यात तोडू शकतो.पण त्याची मानसिक गुलामी त्याला त्या झटक्याने तोडणाऱ्या बलाचीही उर्जा देत नाही. अगदी तसेच हिंदू धर्माचेही आहे. ज्या जातीतून फक्त आणि फक्त गुलामीच निर्माण झाली. यावर एकमेव उपाय अशा जातीसंरचनेच्या धर्माचा त्याग करणे होय.डॉ.  बाबासाहेब आंबेडकर  जातीच्या या अमानुष निर्मितीवर उपाय देतांनी त्यांच्या Annihilation of Caste या पुस्तकात म्हणतात, ” सर्वात पहिली आणि महत्वाची लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे हिंदू समाज ही एक भाकड कथा आहे. जातीचे पालन करण्यात लोकांची चूक नाही. माझ्या मते जर चूक कोणती असेल तर त्यांचा धर्म. कारण त्यानेच जातींची कल्पना लोकांच्या मनावर बिंबविली आहे. हे जर खरे असेल तर ज्याच्याशी तुम्ही दोन हात करावेत असा तुमचा शत्रू जाती पाळणारे लोक नसून ज्या शास्त्रांनी लोकांना जातीधर्म शिकविला ती शास्त्रे तुमचा शत्रू होय हे उघड आहे. सहभोजनात भाग न घेणाऱ्या किंवा मिश्र विवाहास तयार न होणाऱ्या लोकांना शिव्या देऊन किंवा त्यांची टर उडवून काही फायदा होण्यासारखा नाही. तसेच प्रसंगपरत्वे सहभोजन घडविणे किंवा एखादा मिश्र विवाह समारंभ घडवून आणणे हे उपाय अपेक्षित ध्येयाच्या दृष्टीने निरुपयोगी ठरतात. शास्त्रे पवित्र असल्याबद्दलची श्रद्धा नष्ट करणे हा त्यावरील खरा उपाय आहे. लोकांच्या मनावर अंधश्रद्धा बिंबविण्याचे व त्यांची मने घडविण्याचे शास्त्रांचे काम सुरू ठेवून तुम्ही यशाची आशा तरी कशी करू शकता? शास्त्राच्या अधिकाराला शह न देता, लोकांना शास्त्राच्या पवित्र्यावर विश्वास ठेवण्याची परवानगी देऊन केवळ लोकांना निर्दय व बुद्धिहीन म्हणणे हा समाज समाजसुधारणेचा अत्यंत भेकड असा मार्ग होय. प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला शास्त्राच्या दास्यातून मुक्त करा, बुद्धाने जो पवित्र घेतला तोच तुम्हालाही घ्यावा लागेल. केवळ शास्त्रांना झुगारून तुमचा प्रश्न सुटणार नाही तर बुध्द आणि गुरुनानकांप्रमाणे तुम्हाला त्यांचे पवित्र्यही अमान्य करावे लागेल. *‘तुमच्यात जर काही घाणेरडे असेल तर तो तुमचा धर्म होय, या धर्मानेच तुमच्याच जातींच्या पवित्रपणाची भावना निर्माण केली’ असे सांगण्याचे तुम्ही धाडस दाखवाल काय ? म्हणूनच असा धर्म नष्ट केला पाहिजे, असे म्हणतांना मला मुळीच संकोच वाटत नाही. आणि मी तर असे म्हणतो की, असा धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आपण कोणताही अधर्म करीत नाही. खरेच, मी असे ठासून सांगतो की, या नियमांच्या जत्थ्यांच्या संग्रहाचा मुखवटा फोडून टाकणे, धर्माच्या नावाने घातलेला बुरखा फाडून त्याचे खरे स्वरूप उघड करणे तुमचे अटळ कर्तव्य आहे.” बाबासाहेबांच्या याच वक्तव्यावर जणू काय गांधी त्यांच्या ‘हरिजन’ वृत्तपत्रात बाबासाहेबांच्या Annihilation of Caste या पुस्तकावर टीका लिह्तांनी म्हणतात, “डॉ.आंबेडकर हे हिंदू धर्माला मिळालेले आव्हान आहे.” ( Dr,Ambedkar is challenge for Hinduism) 

      १९३६ च्या त्यांच्या जातीच्या या संशोधनावर आधारीत बाबासाहेब २० मे १९५१ दिल्ली येथील भाषणात म्हणतात, “ जर लोक पुन्हा बौध्द धर्माचा अंगीकार करतील तर हा देश पुन्हा वैभवाप्रत गेल्यावाचून राहणार नाही. एरव्ही दुसऱ्या कोणत्याही मार्गाने जातीभेद जाने शक्य नाही. परंतु खरोखरच कोणाला जाती मोडायच्या असतील तर त्यांनी बौध्द धर्माचा स्वीकार करावा. हाच एकमेव उपाय आहे.”

         १९५६ पासून हिंदू धर्माचा त्याग करून ज्यांनी बौध्द धम्म अंगिकारला त्यांच्या जीवनात सर्वच क्षेत्रात अमुलाग्र बदल झाल्याचे दिसून आले आहे.  सुधारणेच्या प्रत्येक क्षेत्रात जात आडवी येत आहे. जोपर्यंत  विनाश होत नाही तोपर्यंत सामाजिक आणि आर्थिक समता नाही. जात ही  हिंदू धर्माला मिळालेली ब्राम्हणांची एक महान अमानुष देन आहे. ज्यात विनाशाशिवाय दुसरे काहीच नाही. *जातीवर असा धर्म त्यागनेच हाच एकमेव उपाय जातीअंतावर आहे. याशिवाय जातीचा नाईनाट होण्याचा दुसरा कोणताच मार्ग नाही.

लेखक:- हर्षवर्धन ढोके

(लेख साभार :- ‘अंधश्रद्धेचा नायनाट’ या पुस्तकातून:- लेखक :- हर्षवर्धन ढोके )

No comments:

Post a Comment